Monday, 29 September 2025

पानंद रस्ते दुरुस्तीला प्राधान्य- राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल



ॲड. जयस्वाल यांच्या हस्ते रामटेक उपविभागात ५९१लाभार्थ्यांना पट्टे वाटप

रामटेक/नागपूर, दि. २७ : पाणंद रस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. शेतात पाणंद रस्त्याच्या माध्यमातून ये-जा होत असते. हे रस्ते दुरुस्त करण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे वित्त  व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल आज येथे म्हणाले. 

        रामटेक येथील गंगा भवन  येथे " सर्वांसाठी घरे" उपक्रमांतर्गत पट्टे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांच्या हस्ते रामटेक उपविभागात 591 लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी प्रियेष महाजन, रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

     जनसामान्यांना हक्काचे घर मिळावे, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी सरकार सातत्याने कार्यरत आहे. या योजनेद्वारे हजारो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य राहणार असल्याचे ॲड आशिष जयस्वाल यावेळी म्हणाले. 

     शासनाच्या विविध योजनांमुळे आता नागरिकांना घर बसल्या ऑनलाइन सेवा मिळत आहेत. पूर्वी सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागत असत परंतु आता पारदर्शक आणि जलदगतीने निर्णय होत असून जनतेच्या अडचणी कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

       जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्ह्याला पाणंद रस्ता उपक्रमांतर्गत राज्यात अव्वल क्रमांकावर न्यायचे आहे. जिल्ह्यातील अनेक पाणंद रस्ते मोकळे झालेले आहेत. अजून काही कामे बाकी आहेत. ती कामे येत्या काळात पूर्णत्वास न्यायची आहेत. पट्टे वाटपातही नागपूर जिल्हा अग्रेसर आहे. येत्या काही दिवसात पट्टे वाटपाचे उर्वरित काम पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. 

     या कार्यक्रमात नगर परिषद कन्हान अंतर्गत 153,नगर पंचायत पारशिवनी अंतर्गत 71, नगर पंचायत कांद्री अंतर्गत 29, पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत ग्रामीण भागातील 49 असे पारशिवनी तालुक्या अंतर्गत एकूण 302 तसेच मौदा तालुक्यातील रामटेक विधानसभा मतदार संघांतर्गत 102 मालकीहक्क पट्टे गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.   

     रामटेक तालुक्या अंतर्गत ग्रामपंचायत सालईमेटा, मनसर, नवरगांव, पिंडकापार(सोनपूर), पटगोवारी येथील 117 शासकीय जागेवरील रहिवासी प्रयोजनार्थ मालकीहक्क पट्टे तसेच मौजा कट्टा, कांद्री, लोहडोंगरी येथील एकूण 70 वनहक्क पट्टे गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

                                                   0000

No comments:

Post a Comment