नागपूर, दि.२७ : श्री
नरकेसरी प्रकाशन संस्था आणि दै. तरुण भारत
वृत्तपत्राने राष्ट्र पुनर्निर्माण आणि राष्ट्रवादी विचारांची सदैव कास धरून माध्यम
व्यवहार केला. ‘अमृत योग’ हा विशेषांक या व्रतस्थ कार्याचा उज्ज्वल ऐतिहासिक ठेवा असल्याचे
प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
वनामती सभागृहात आयोजित श्री नरकेसरी प्रकाशन
लि. या संस्थेच्या अमृत महोत्सवी सांगता कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या
हस्ते 'अमृतयोग' या विशेषांकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. श्री नरकेसरी
प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विलास डांगरे,कार्याध्यक्ष अनिल दांडेकर ,व्यवस्थापकीय
संचालक धनंजय बापट दै. तरुण भारतचे संपादक शैलेश पांडे व संस्थेचे पदाधिकारी आदी यावेळी
उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, श्री नरकेसरी
प्रकाशन संस्था आणि दै. तरुण भारत हा संघर्ष व बलिदानाचा प्रवास आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या पुढाकारातून नरकेसरी अभ्यंकर यांनी
साप्ताहिक स्वरूपात सुरू केलेल्या साप्ताहिक तरुण भारत ते पुढे 1949 मध्ये दैनिक म्हणून
थोर साहित्यिक ग.त्र्यं. माडखोलकर यांनी संस्थापक संपादक या नात्याने दिलेला भक्कम
वैचारिक वारसा मोलाचा ठरला. पुढे हिच संपादकांची व त्यांच्या वैचारिकतेची परंपरा चालू
राहिली. संघर्षाचा काळ आला तरीही वैचारिक अधिष्ठानाला कुठेही मुरड न घालता या संस्थांनी
केलेले कार्य चिरकाल टिकणारे व भविष्यातील पिढींना मार्गदर्शक आहेत असे गौरवोद्गार,
श्री गडकरी यांनी यावेळी काढले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
व्यवस्थापकीय संचालक धनंजय बापट यांनी प्रास्ताविक
केले तर संपादक शैलेश पांडे यांनी अमृतयोग
विशेषांका मागील भूमिका स्पष्ट केली व उपस्थितांचे आभार मानले.
श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचा अमृत महोत्सव आणि
या संस्थेतर्फे संचालित दै.तरुण भारतचा शताब्दी महोत्सव यानिमित्ताने तयार करण्यात
आलेल्या 'अमृतयोग' विशेषांकात या प्रकाशन संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास,दै. तरुण
भारतचा या संस्थेसोबतचा सहप्रवास यासह गेल्या शतकात मराठी वृत्रपत्रसृष्टीत घडलेल्या
स्थित्यंतराचा वेध घेण्यात आला आहे.
0000
No comments:
Post a Comment