नव्याने निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्राचा शुभारंभ
नागपूर, दि. 29 : नव्याने निवड झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी
जलद व भ्रष्टाचार मुक्त सेवा देतांनाच कर्तव्यनिष्ठेने
व सामाजिक भावनेने काम करून सर्वसामान्य जनतेचा
विश्वास संपादन करा, असा सल्ला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिला.
वनामती येथे राज्य सेवा परिक्षेच्या
माध्यमातून निवड झालेल्या 85 अधिकाऱ्यांच्या दोन वर्षीय एकत्रित 11 व्या परिविक्षाधिन
प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते झाला.
त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
यावेळी वसंतराव नाईक राज्य कृषी
विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या संचालक आशा पठाण, प्रशिक्षण सत्राच्या संचालिका
श्रीमती सुवर्णा पांडे, सामान्य प्रशासन विभागाचे सुनिल निकम, श्रीमती अपुर्वा रोडे,
श्रीमती भारसाकळे, वनामतीचे निबंधक निर्भय जैन आदी उपस्थित होते.
भारतीय प्रशासकीय सेवेच्या धरतीवर
राज्यातील अधिकार्यांना प्रशिक्षण देण्याचा
महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने
रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दोन वर्षीय प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधीत एम ए (विकास प्रशासन) ही पदवी
सुद्धा देण्यात येणार आहे.
प्रशिक्षिणार्थी अधिकाऱ्यांनी आपली स्वच्छ
प्रतिमा निर्माण करतानांच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याला प्राधान्य असावे, तसेच
दैनंदिन कामात गतिमानता वाढवायला प्राधान्य द्यावे अशी सूचना श्रीमती बिदरी यांनी केली.
प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होतांना सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण करतांनाच
उत्कृष्ट अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवा. राज्याच्या सर्वांगिण विकासाची जबाबदारी आपलीच
आहे, ही भावना ठेवून सेवेला सूरवात करा. असा सल्ला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी
यांनी यावेळी दिला.
प्रत्येक काम कर्तव्यनिष्ठेने
व प्रामाणिकपणे करतांनाच आपल्या दैनंदिन कामामध्ये पारदर्शकता ठेवतांना प्रशासनाबद्दल
गैरसमज निर्माण होणार नाही. याची खबरदारी घेण्याचा सल्ला देतांना वनामीच्या संचालक
श्रीमती अशा पठाण यांनी यावेळी दिला.
प्रारंभी एकत्रित परिविक्षाधिन
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संचालक श्रीमती सुवर्णा पांडे यांनी 11 व्या बॅचसाठी 85 अधिकाऱ्यांची
निवड झाली असून पायाभूत प्रशिक्षण चार सत्रात पूर्ण करावयाचे आहे. प्रशिक्षण कालावधीनंतर
1 हजार 600 मार्काची परिक्षा घेण्यात येणार आहे. सेवाकालावधीतील हे प्रशिक्षण अत्यंत
उपयुक्त ठरणार असल्यामूळे प्रत्येक सत्रामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा,
अशी सूचना यावेळी केली.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे
सुनिल निकम यांनी राज्य प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होणारे अधिकाऱ्यांसाठी वनामती येथे
राज्यस्तरीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण कालावधीत यशस्वी झालेल्या
विद्यार्थ्यांना सेवाजेष्ठता यादीतही समावेश राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना कर्तव्य पालनाची
शपथ दिली. कार्यक्रमाचे संचलन मिलिंद तारे यांनी तर आभार प्रदर्शन वनातीचे निबंधक निर्भय
जैन यांनी केले.
0000
No comments:
Post a Comment