सरसंघचालक प. पू. डॉ मोहनजी भागवत यांच्या हस्ते
शंकर महादेवन यांनी गायलेल्या
संघगीतांचे लोकार्पण
नागपूर,दि. 28 : आज वातावरण बदलासह पर्यावरण व निसर्गाच्या अनेक प्रश्नांवर अवघे जग चिंतन करते आहे. यातून मार्गक्रमण करीत असताना संघ गीतापैकी एक असलेले, “निर्माणों के पावन युगमे, हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में, वसुधा का कल्याण न भूले।” हे प्रेरणा गीत भविष्यातही दिशा देणारे आहे, मार्गदर्शन करणारे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित संघगीत- लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सोले, सन्माननीय लोकप्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आज कॉपी राईटच्या जमान्यात आपण आहोत. संघाच्या आजवरच्या वाटचालीत शुद्ध देशप्रेमाची भावना असल्याने ही प्रेरणा गीते ज्यांनी लिहिली त्यांनी आपल्या नावापेक्षा देशहिताला, देशप्रेमाल वाहते केले. या गीतातून ही संघभावना आपल्या पुढे प्रवाहित झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
संघगीत सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी यांनी या संकल्पनेला जन्म दिला. तो अत्यंत आवश्यक होता. ज्यांच्या नावात शंकर आहे आणि महादेव पण आहेत अशा गायकाने आता ही गीते गायली आहेत. महादेव आपल्या जटांमध्ये गंगाला धारण करतात आणि हे शंकर आपल्या गळ्यात स्वरगंगेला धारण करतात या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंकर महादेवन यांचा गौरव केला.
संघ गीतांच्या मागे जीवनाची तपस्या - सरसंघचालक प. पू. डॉ मोहनजी भागवत
संघ गीतांच्या मागे जीवनाची तपस्या आहे. केवळ शब्द आणि संगीताची हे सादरीकरण नाही. ह्यांनी ही गीते लिहिली त्यांनी जीवनाची तपस्या यात अर्पण केली असल्याचे भावोद्गार सरसंघचालक प. पू. डॉ मोहनजी भागवत यांनी काढले. शंकर महादेवन यांनी दर्जेदार गायन केले आहे. संघगीतांमधील भाव समजून त्यांनी गीते गायली आहेत या शब्दात त्यांनी महादेवन यांचा गौरव केला.
जीवनाला घडविण्याचे सामर्थ्य संघगीतात- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
शंकर महादेवन यांच्या आवाजाने ही गीते प्रभावी झाली आहेत. सामाजिक दायित्व, राष्ट्रभक्ती यातून दिसून येते. येत्या काळात डिजिटल माध्यमातून ही गीते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अल्बममधील
काही गीतांचे सादरीकरण शंकर महादेवन यांनी केले.
सूत्रसंचालन शरद केळकर यांनी केले. शंकर महादेवन, कुणाल जोशी, श्री. शृंगारपुरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अनिल सोले यांनी आभार मानले.
0000
No comments:
Post a Comment