Monday, 15 September 2025

कापूस पिकावरील कीड व बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागाचा सल्ला

 

 

नागपूर,दि. 15 : कापूस पिकावर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव डोंबकळयाच्या स्वरुपात दिसून येतो त्यापासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

कापूस पीक हे सध्या 40 ते 50 दिवसाचे झाले असून बऱ्याच ठिकाणी फुलावर आले आहे. त्यावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात दिसून आलेला आहे. या प्रकारच्या किडींच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजनाचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

     पीक  उगवणीनंतर 40 ते 45 दिवसांनतर कामगंध सापळ्यांच्या वापराचा सल्ला देण्यात आला आहे. एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करिता हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे लावावेत असेही सांगण्यात आले आहे. पिकातील डोमकळ्या नियमीत शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्यात. पीक उगवणीनंतर 55 ते 60 दिवसांनी 12 ते 15 दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र किटकाची 1.5 लक्ष अंडी प्रति हेक्टरी सहा वेळा सोडावे.

        प्रत्येक आठवडयाला एकरी शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झडावरील फुले, पात्या व बोंडांची संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी.

       गुलाबी बोंड अळीच्या  प्रादुर्भावाची टक्केवारी 5 टक्के पेक्षा जास्त आढळल्यास रासायनिक किटकनाशक इंडोक्साकार्ब 14.50 टक्के एससी 10 मिली किंवा स्पिनेटोराम 11.70 टक्के एससी 9 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के इसी 30 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20 टक्के इसी 25 मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  तसेच प्रादुर्भावाची टक्केवारी  10 टक्के पेक्षा जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट 1.5 टक्के आणि प्रोफेनोफॉस 35 टक्के डब्ल्युडीजी 14 ग्रॅम किंवा सायंट्रानिलीप्रोल 8 टक्के आणि डायफेनथ्युरॉन 40 एससी 13 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के आणि सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 1.1 टक्के आणि डायफेनथ्युरॉन 30 एससी 20 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 आणि फेनप्रोपॅथ्रिन 5 टक्के इसी 30 मिली यापैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

000000


No comments:

Post a Comment