Friday, 3 October 2025

केपीसीएल व अरविंदो कंपनीच्या प्रकल्पांद्वारे बाधीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी घेतली आढावा बैठक

 

 

नागपूर, दि. 01 : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्याच्या बराज मोकासा स्थित केपीसीएल कंपनीच्या कोळसा खाण आणि याच तालुक्यातील बेलोरासहीत अन्य 11 गावांच्या जमीनी अधिग्रहणाद्वारे बाधीत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय मागावर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली.

 

या बैठकीस वरोरा मतदार संघाचे आमदार करण देवतळे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्‍मी बिदरी, अपर आयुक्त पुनर्वसन प्रदीप कुलकर्णी, चंद्रपूरचे अपर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, खनिकर्म संचालक डॉ. जी. डी. कामडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अतुल जताळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे, बाधीत शेतकरी व केपीसीएल आणि अरविंदो कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

बराज मोकासा येथील कोळसा खनन प्रकल्प उभारतांना केपीसीएल कंपनीने केलेल्या कराराची अंमलबजावणीबाबत यावेळी सविस्तर माहिती घेण्यात आली. या करारानुसार प्रकल्पग्रस्तांना रोजगार, जमिनीचा मोबदला आदींबाबत यापूर्वीच्या बैठकांमध्ये देण्यात आलेल्या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. या करारानुसार कंपनीने आश्वासित कामे वेळेत पूर्ण करावी व ती पूर्ण न झाल्यास कंपनीवर नियमाप्रमाणे कारवाई करावी, असे आदेश श्री अहीर यांनी दिले.

 

बेलोरा व नजिकच्या 11 गावांच्या शेतकऱ्यांची जमीन भुसंपादन करतांना अरविंदो कंपनीने शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. या भुसंपादनास 11 गावांतील 6 ग्रामपंचायतींनी ग्रासभेत विरोध दर्शविल्याची बाबही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मांडली. यासंदर्भात दखल घेत श्री. अहीर यांनी भुसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार व्हावी व याआधी झालेली प्रक्रिया तपासण्यासाठी तातडीने जिल्हा प्रशासनाने बैठक घ्यावी, अशी सूचना केली.

0000


No comments:

Post a Comment