नागपूर, दि. 9 : संपूर्ण महाराष्ट्राच्या मजबुतीकरणात महत्त्वपूर्ण असणारी तसेच भारतामध्ये अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचा नावलौकिक आहे. येथील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातही उच्च पदावर मोठ्याप्रमाणावर संधी प्राप्त होत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्र हितासाठी कसा करता येईल, याचा प्राधान्याने विचार करावा. असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित काँग्रेसनगर येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी परम संगणकाचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर, प्राचार्य डॉ. देवेंद्र बुरघाटे, धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य बबनराव तायवाडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेव भुईभार, सुरेश ठाकरे, सचिव वि. गो. भांबूरकर, सदस्य अरविंद मंगळे तसेच विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, येत्या काळात जगामध्ये केवळ भारतीयांकडे युवा संसाधन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध राहणार आहे. युवकांची संख्या सर्वाधिक भारताकडे असल्यामुळे आपल्या देशासाठी संधीची नवी कवाडे उघडली जाणार आहे. तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा उठविण्यासाठी देशातील युवकाला कौशल्यावर आधारिता ज्ञान मिळणे गरजेचे आहे. यासाठी तरुणांसाठी ‘स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ सुरु करण्यात आले आहे. परदेशात मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळत असतांना देखील ज्यांनी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून आपला देश सोडला नाही अशा परम संगणकाचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवाचे रितसर उद्घाटन झाल्यानंतर महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या एम. पी. एस. सी. व यु. पी. एस. सी. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच उत्तम शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट प्राचार्य म्हणून डॉ. देवेंद्र बुरघाटे यांना सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्तम शिक्षक म्हणून प्रा. दीपक कडू आणि डॉ. लक्ष्मण हिरुळकर यांना देखील सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये तानिया रैना, अश्लेषा गणोरकर, भारती बजाज तसेच परदेशामध्ये शिष्यवृत्ती प्राप्त झालेला आशिष गंगचेट्टीवार या विद्यार्थ्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘भारती’ या ग्रंथाचे विमोचन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
******


No comments:
Post a Comment