Monday, 15 August 2016

सायबर लॅबमुळे गुन्हेगारीवर वचक - चंद्रशेखर बावनकुळे

*     नागपूर जिल्हा गुन्हेगारी मुक्त करणार
*     आधुनिक यंत्रणेसाठी 50 लक्ष रुपये
*     सर्व पोलीस स्टेशन सीसीटीव्ही सर्वेक्षणामध्ये
*     अवैध दारु व गुन्हेगारी विरुद्ध कडक कार्यवाही

       नागपूर दि. 15:  इंटरनेटच्या माध्यमातून व अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने सायबर गुन्ह्यांचा शोध घेवून गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी सायबर लॅबमुळे मदत होणार आहे. सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी व जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यासाठी 50 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केली.
            नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या परिसरात अत्याधुनिक सायबर लॅब तयार करण्यात आली असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्याक्रमात ते बोलत होते.
            यावेळी आमदार सुनिल केदार, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, जिल्हा पोली अधिक्षक अनंत रोकडे, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक नरसिंग शेरखाने उपस्थित होते.
            माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नविन माध्यम सोशल नेटवर्कींग ई-बँकींग आदीच्या वाढत्या वापरा बरोबर सायबर क्राईम वाढत आहे. सायबर क्राईमचा तात्काळ शोध लावून गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी सायबर लॅबअत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 44 ठिकाणी एकाचवेळी सायबर लॅब सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुन्ह्याचा शोध व प्रतिबंध घालण्यास पोलीस विभागाला यामुळे मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            नागपूर जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम व प्रशिक्षित करण्यासोबत अत्याधुनिकीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून प्रत्येकी 50 लक्ष रुपयाचा निधी ग्रामीण व नागपूर (शहर) पोलीस यंत्रणेला देण्यात येणार असल्याचेही यावेळी पालकमंत्र्यांनी जाहीर केले.
            जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन सीसीटीव्ही अंतर्गत जोडण्यात येवून ती जिल्हा पोलीस अधिक्षक व पोलीस महानिरिक्षक कार्यालयाशी जोडण्यात येतील. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यात येणार असल्याचेही तयांनी सांगितले.
                                 

गुन्हेगारींवर चाप लावा  
       जिल्ह्यात अवैध दारु विरुद्ध उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यंत्रणांनी सयुक्तपणे मोहिम राबवून जिल्ह्यातील प्रत्येक गावामधून अवैध दारु विरुद्ध कार्यवाही करा अशा सूचना देतांनाच पालकमंत्री म्हणाले की जिल्ह्यात 24 ताडीचे दुकाने आहेत. परंतू तेवढे ताडीवृक्ष नाही. त्यामुळे ताडीनिर्मितीसाठी होणाऱ्या घातक पदार्थाचा शोध घेवून कठोर कारवाई करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आधुनिक फॉरेसिक मोबाईल व्हॅन
            गुन्ह्यातील भौतिक पुरावा गोळा करण्याकरीता व दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे तसेच गुन्हेगारांना शिक्षा करणे यासाठी ग्रामीण पोलीस दलाला आधुनिक फॉरेंसिक मोबाईल व्हॅन उपलब्ध झाली आहे. मोबाईल व्हॅनचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले.
            जिल्हा पोलीस अधिक्षक अनंत रोकडे यांनी स्वागत करुन डिजीटल गर्व्हनसकरीता संगणक प्रणालीचा प्रभावी वापर, गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी एसएमएस बेस, एसडिआर सपोर्ट योजना, प्रतीसाद ॲप, पोलीस मित्र ॲप, वाहन पोर्टल आदी योजनांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            सायबर लॅबचे प्रमुख म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद सराफ राहाणार आहेत.
            कार्यक्रमाचे संचालन व आभार पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र तायडे यांनी मानले.

* * * * *

No comments:

Post a Comment