Saturday, 13 August 2016

प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून जनतेची सेवा करा -- प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे


नागपूर, दि. 9  : संसदीय कामकाज पद्धतीमध्ये संसद आणि विधिमंडळाचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. संसद आणि विधिमंडळ या दोन्ही संस्था जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महत्त्वाच्या लोकशाही संस्था आहे. म्हणून शासकीय कामकाजात विधानमंडळाची भूमिका फार महत्त्वाची आहे.तेव्हा भावी अधिकाऱ्यांनी विधिमंडळाचे कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपल्या प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून गुड गव्हर्नन्स राबवून जनतेची सेवा करावी. असे आवाहन विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी केले.
वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर, विधान मंडळ सचिवालय आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र लोक सेवा आयोग मार्फत सरळ सेवेने निवड झालेल्या नवनियुक्त गट ब प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे विधिमंडळ कामकाजाबाबतचे ३ दिवसीय प्रशिक्षण आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथील विधान भवन संकुलातील विधान सभा सभागृहात सुरु झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रधान सचिव, विधानमंडळ डॉ. अनंत कळसे, यांचे हस्ते झाले. या वेळी प्रभारी महासंचालक वनामती विजय घावटे, सहसचिव म. मु. काज, विशेष कार्य अधिकारी सुभाषचंद्र मयेकर तसेच  अपर संचालक वनामती मिलिंद लाड, अवर सचिव सुनील झोरे, प्रशासन अधिकारी श्रीमती सुवर्णा पांडे तसेच विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी, वनामतीचे संबंधित अधिकारी   प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी भारतीय राज्य घटनेचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर मार्गदर्शन केले. या संदर्भात भारतीय राज्य घटनेची मांडणी करतांना आपल्या घटनाकारांनी इतर देशातील जसे ब्रिटन अमेरिका, फ्रांस मधील घटनांची कोणकोणती प्रवधाने विचारात घेतली गेली या बद्दल माहिती दिली. सर्व परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी भारतीय राज्य घटनेचा सखोल अभ्यास करुन घटनेच्या चौकटीत राहून प्रशासनाची अंमलबजावणी करावी.  प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी विषयानुरूप उत्तरे देखील दिली. याप्रसंगी, वनामती चे प्रभारी महासंचालक विजय घावटे यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी शिस्तीचे पालन करीत सचोटीने काम करावे असे सचविले.
या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई  येथील चमू आलेली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सेवेतील गट ब संवर्गातील नायब तहसिलदार, कक्ष अधिकारी, उप अधीक्षक भूमी अभिलेख, सहा. गट विकास अधिकारी,सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी,सहा. निबंधक सहकारी संस्था  असे एकूण ८९ प्रशिक्षणार्थी हजर आहेत..
सुरवातीला वनामतीचे जनसंपर्क अधिकारी पु. ना. राऊत ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  कार्यक्रमाचे संचालन  प्रशिक्षण समन्वयक मिलिंद तारे ह्यांनी तर  वनामतीचे प्राध्यापक डॉ. किशोर वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले.
****

No comments:

Post a Comment