Sunday 18 December 2016

विधीमंडळ अधिवेशनात भरीव कामकाज 27 विधेयकांवर विचार, 23 विधेयके संमत -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूर दि. 17 -:  विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये भरीव कामकाज झाले असून सर्वाधिक 27 विधेयके सादर झाली. त्यापैकी दोन्ही सभागृहात 23 विधेयके मंजुर झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात झालेल्या भरीव कामकाजाबद्दल पत्रकारांना माहिती दिली.
हिवाळी अधिवेशन अत्यंत यशस्वीपणे पूर्ण झाले असून प्रथमच दोन्ही सभागृहात सर्वाधिक विधेयके मंजूर झाली असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, तीन विधेयके विधानसभेत तर एक विधेयक विधान परिषदेत प्रलंबित‍ आहे. संमत झालेल्या विधेयकामध्ये महाराष्ट्र स्थानिक सदस्य प्राधिकरण अनहर्ता (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र आधार (वित्तीय आणि अन्य सुधारणा), लाभ व सेवा यांचे लाभार्थी यांना वितरण, महाराष्ट्र दारुबंदी सुधारणा विधेयक (ग्राम रक्षक दल स्थापने संदर्भातील तरतूदी), महाराष्ट्र, (नागरी क्षेत्र), वृक्ष संरक्षण व जतन सुधारणा विधेयक, महाराष्ट्र खनिज विकास निधी (निर्मिती व उपयोजना) (निरसन विधेयक), महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी (सुधारणा विधेयक), महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा विधेयक) आदी विधेयकांचा यात समावेश आहे.
 छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई याचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा नामविस्तार तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई याचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा नामविस्तार करण्यासंदर्भात केंद्र शासनाला शिफारस करण्याबाबत शासकीय ठराव मंजुर करण्यात आला आहे. त्यासोबतच एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनचे नामांतर प्रभादेवी करण्याबाबतही यामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचा असलेला समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांनी संमती पत्र दिले असून या महामार्गासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे निश्चितच निर्धारित कालावधित पूर्ण करण्यात येईल असे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले, विकासाच्या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र यावे ही शासनाची भुमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संसदिय कार्यमंत्री गिरीश बापट, कृषिमंत्री पांडूरंग फूंडकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल,आदी लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
                                                          00000

No comments:

Post a Comment