नागपूर, दि. 14 : नागपूर, वर्धा व बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या समस्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने विविध उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिल्या.
सहकार विभागातर्फे रविभवन येथील कुटीर क्रमांक 25 येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंक, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक तसेच संबंधीत अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव एस.एस.संधू, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम.एल.सुखदेवे, वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवल प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिका-यांनी सांगितले की, राज्यात एकुण 31 जिल्हा मध्यवर्ती बँक असून नागपूर, वर्धा व बुलढाणा या बँकांवर प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. रिझर्व बँकेचा परवाना नसल्याने नागपूर, वर्धा व बुलढाणा या बॅंकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र शासनाने पुढाकार घेऊन सुमारे 520 कोटीचे अर्थसहाय्य भाग भांडवलाच्या स्वरुपात उपलब्ध करुन दिल्याने या तिन्ही बँकांना रिझर्व्ह बँकेचा परवाना प्राप्त झाला आहे. तरीसुध्दा या बँकांना थकित कर्ज वसूली, ठेवी वाटप व पीक कर्ज वाटप या स्वरुपाचे काम करण्यास अडचण निर्माण होत आहे. या बाबतच्या विविध कारणांचा आढावा सहकार मंत्री श्री. देशमुख यांनी या बैठकीत घेतला. त्यावेळी तिन्ही जिल्हयात दुष्काळाच्या कारणामुळे कर्ज वसूली झाली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठकीत विविध उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले. त्यात या बँकांची स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, शिक्षक व शिक्षकेत्तर, कर्मचाऱ्यांचे पगार जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत करण्यासाठी सहकार विभागाकडून ग्राम विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यावर चर्चा करण्यात आली.
नागपूर, वर्धा व बुलढाणा या तिन्ही जिल्हा मध्यवर्ती बँकांना येणाऱ्या हंगामात पीक कर्ज वाटपासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून फेरकर्ज पुरवठा करण्याबाबत आढावा घेण्यात आला. मात्र या बँका नाबार्डचे निकष पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर फेरकर्ज पुरवठा करण्याबाबतची हमी घेण्यासाठी सहकार विभागाकडून मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव सादर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच या तिन्ही बँकांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करता येईल का?, या बाबतची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला देण्यात आल्या.
या बैठकीत सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व नागपूर, वर्धा, बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
*****

No comments:
Post a Comment