नागपूर, दि. 13- विदर्भ विकासाच्या विविध प्रश्नांवर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी विदर्भ विकास मंडळाच्या तज्ज्ञ सदस्यांसमवेत नागपूर येथील राजभवन येथे बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.
या बैठकीस विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुपकूमार, तसेच तज्ज्ञ सदस्य सर्वश्री ॲड मधूकरराव किंमतकर, डॉ.कपिल चांद्रायण, डॉ.आनंद बंग, डॉ.किशोर मोघे, डॉ.रविंद्र कोल्हे, सदस्य सचिव अरविंद देशमुख, राज्यपालांचे सचिव वेणू गोपाल रेड्डी, उपसचिव परिमलसिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीस विभागीय आयुक्त अनुपकूमार यांनी राज्यपाल महोदयांचे स्वागत करुन प्रास्ताविकात विदर्भ विकास मंडळाच्या कामकाजाची माहिती दिली. तज्ज्ञ समिती सदस्य डॉ.रविंद्र कोल्हे म्हणाले की, मेळघाटातील विकासासाठी विद्यूत पुरवठा ही महत्वाची समस्या आहे. 132 केव्ही वीजेचे टॉवर उभारणीसाठी सद्यस्थितीतील अडीअडचणी सांगून उपाय योजनांवर भर दिला.
डॉ.आनंद बंग म्हणाले की, आश्रमशाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी ओरिसा भुवनेश्वर येथील कलिंगा मॉडेलच्या धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांचा विकास व्हावा. माता, बाल मृत्यू आणि कुपोषणावरील खर्चाच्या आकडेवारीची तपासण्यात यावी. तसेच आरोग्य, महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्याचे स्वतंत्रपणे नियमित मूल्यमापन करण्यात यावे. दारु आणि तंबाखू हे आदिवासीच्या अविकासाचे आणि शोषणाचे प्रमुख कारण आहे. यासाठी दारु आणि तंबाखू नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. त्याच्या नियमित आढावा घेण्यात यावा.
ॲड मधुकरराव किंमतकर यांनी विदर्भाचा रस्ते, सिंचन आणि नोकऱ्यातील अनुशेष भरुन काढण्यासाठी उपाययोजना आखाव्यात असे सांगितले. डॉ.किरण मोघे यांनी ग्रामसभा सक्षमीकरणासाठी गावपातळीवर स्वशासन आणि विकासाचे नियोजन करण्यासाठी संसाधनांची उभारणी करावी लागेल असे सांगितले.
राज्यपालांनी विदर्भ विकास मंडळाच्या सर्व तज्ज्ञ सदस्यांनी विदर्भातील विविध प्रश्नांवर सुचविलेल्या उपाययोजनांवर चर्चा केली.
00000

No comments:
Post a Comment