Friday, 2 December 2016

ग्रामीण भागातील जनेतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यालयी रहा - चंद्रशेखर बावनकुळे


  • पारडसिंगा येथे पालकमंत्र्यांचा जनसंवाद
  • विद्युत सुधारणेसाठी एक कोटी दहा लक्ष
  • शेतकऱ्यांना विजेची अडचण जाणार नाही
  • प्रत्येक ग्रामपंचायतला मिळणार लाईनमन
  • विद्युत, कृषी, पाणी पुरवठयाला प्राधान्य
  • मुख्यालयी न राहणाऱ्या विरुध्द कार्यवाही

नागपूर दि.27 :   ग्रामीण भागात कृषी आरोग्य व पाणी पुरवठयासंदर्भात जनतेशी संबंधित विभागासंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेतांना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्या विरुध्द कडक कार्यवाहीचे निर्देश देतांनाच दोन वेतनवाढ रोखण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.
पारडसिंगा येथे शासन आपल्यादारी या उपक्रमाअंतर्गत जनतेच्या विविध समस्या पालकमंत्री यांनी जाणून घेतल्यानंतर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना निर्देश देतांना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, आमदार आशिष देशमुख, मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी भगत, सभापती उकेश चव्हाण, प्रतिभा मांडवकर, काटोलच्या नगराध्यक्षा श्रीमती जोशी, संजय टेकाडे, किशोर रेवतकर, प्रेरणा बारोकर, दिलीप जाधव आदी उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजनांच्या लाभ ग्रामीण जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात जाऊन योजनांच्या लाभ देण्यांची सूचना करताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना शेतीसाठी व उत्पादन वाढीसाठी सहज व सूलभ वीज उपलब्ध व्हावे यासाठी पारडसिंगा या भागासाठी एक कोटी दहा लक्ष रुपये देखभाल व दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात विजे संदर्भातील तक्रारी सोडवा असे निर्देश त्यांनी दिले.
एक गाव एक लाईनमेन ही योजना प्रत्येक गावात राबविण्यात येणार असून ग्रामसभेने ठराव घेऊन गावातील आयटीआय इलेक्ट्रीशनची निवड करावी. अशी सूचना करतांना पालकमंत्री म्हणाले की, विद्युत अधिकाऱ्याबद्दल ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेतांना काटोलच्या कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता व शाखा अभियंता यांच्या विरुध्द कार्यवाहीचे निर्देश दिले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवूण शेतीच्या सिंचनासाठी वीज उपलब्ध होईल यासाठी विद्युत वाहिण्यांची देखभाल, दुरुस्ती करा असेही ते म्हणाले.
पारडसिंगाच्या गावासाठी एक कोटी अकरा लक्ष रुपये खर्चाची योजना मंजूर असून ती तातडीने सुरु करा असे सांगतांना पालकमंत्री म्हणाले की, बांधकाम व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी रहावे. 14 व्या वित्त आयोगामधून गावाला मिळालेल्या निधीतून पिण्याचे पाणी, गावात स्वच्छता, फॉगींग मशीन घेण्यासाठीच खर्च करावा. इतर कामांना प्राधान्य देण्यात येऊ नये असेही ते म्हणाले.
प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेतच जात प्रमाणपत्र व शेतकऱ्यांना घरपोच सातबारा उतारा देण्यात येणार आहे. महसूल विभागाने पट्टे वाटपाचे कार्यक्रम सुरु करावे, असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन हे करण्यात आले आहे. कृषी विभागाने योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देतांनाच कृषी सहाय्यकाने दररोज शेतकऱ्याच्या शेतात जावून त्यांना मार्गदर्शन करावे. यासाठी मुख्यालयी रहावे असे निर्देश दिले.
आरोग्य विभागाने गावातील स्वच्छतेला प्राधान्य देतांना गावात वर्षातून 24 वेळा फवारणी करावी. दूर्भर आजाराच्या रुग्णांची नोंदणी करावी व अपंगांना आवश्यक सुविधा द्याव्यात, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ग्रामीण भागात अवैध दारुविक्री होणार नाही यासाठी विशेष मोहिम राबवा. तसेच गावात शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी पोलीस विभागाने काम करावे असेही ते म्हणाले.
आमदार आशिष देशमुख यांनी शासन आपल्यादारी या उपक्रमामुळे जनतेच्या तक्रारी सोडविण्याला मदत होईल. तसेच विविध योजनाच्या बळ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विविध विभाग प्रमुखांनी योजनांची माहिती दिली. ग्रामस्थांनी गावातील विविध प्रश्न यावेळी सांगितले.
00000000

No comments:

Post a Comment