· एकता दौड रॅली पूर्वतयारीचा आढावा
· जिल्हयात विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर दि. 27 : देशाचे उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्य जयंतीनिमित्त आयोजित ‘एकता दौड’मध्ये विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के.राव यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के.राव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत बैठक पार पडली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत एकता दौडसाठी आवश्यक पूर्वतयारीचा आढावा घेतला. विद्यार्थी व नागरिक यांच्यात जनजागृती निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने दिनांक 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस तसेच इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने राष्ट्रीय संकल्प दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्ताने एकता दौड तसेच पोलिस विभागाकडून पथसंचलन आदी कार्यक्रमांसह 60 ते65 विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याकरीता महानगरपालिकेमार्फत रुग्ण्वाहिका, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनामार्फत चोख सुरक्षा व्यवस्था तसेच वाहतूक व्यसस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्याकरीता पूर्वतयारी करण्यात आली आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून के.एन.के. राव यांनी आढावा घेतला.
एकता दौडसाठी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच राष्ट्रीय एकता दिवसाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
ही एकता दौड सकाळी 8 वाजता संविधान चौक येथून सुरु होणार असून आकाशवाणी चौक, व्हीसीए, के.पी.ग्राऊंड मार्गे संविधान चौक येथे तिचा समारोप होईल. तर दुपारी 4 वाजता फुटाळा तलाव येथे गृहरक्षक दल, शहर व ग्रामीण पोलीस, विशेष पथक, पोलीस बँड पथसंचलन करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पोलिस प्रशासन, महानगरपालिका, क्रीडा विभाग, नगरपालिका प्रशासन, शिक्षण विभाग तसेच विशेष शाखेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
एकता दौडमध्ये सहभागी होण्यासाठी मनपा सहाय्यक आयुक्त महेश मोरोणे(9823330932) यांचेशी संपर्क साधावा. असेही यावेळी कळविण्यात आले आहे.
** * * * **
No comments:
Post a Comment