विधान परिषदेत सभापतींनी मांडला अभिनंदनाचा ठराव
मराठीच्या शब्दकोषात सातत्याने नवीन शब्दांची भर पडावी
मुंबई, दि. 27 : मराठीच्या शब्दकोषात सातत्याने नवीन शब्दांची भर पडावी त्यासाठी ऑक्सफर्ड शब्दकोष सारखी व्यवस्था निर्माण करावी असे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. कविवर्य श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रामध्ये दिलेले मोलाचे योगदान, मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेले परिश्रम लक्षात घेता त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजेच 27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषागौरव दिन” म्हणून साजरा करण्याचे ठरविल्या बद्दल शासनाचे अभिनंदन करण्याचा ठराव सभापतींनी आज विधान परिषदेत मांडला.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन त्यानंतरच्या काळात मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीच्याविकासाला चालना देण्यासाठी भाषा संचालनालय, विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या संस्थांची निर्मिती करणे मराठी भाषा धोरण ठरविण्यासाठी भाषा सल्लागार समिती नेमेणे यासाठी शासनाचे, तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अविरतपणे योगदान देणा-या सर्व साहित्यिकांचे सभापतींनी अभिनंदन केले
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणार - विनोद तावडे
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावून देण्यासाठी लागणारे पुरावे गोळा करण्यात आले असून यासंदर्भातील पूर्तता करून केंद्र शासना कडे पाठविण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर केंद्राकडे या बाबतचा पाठपुरावा करण्यात येऊन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणार असे शालेय शिक्षाण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. ‘मराठी भाषागौरव दिन” म्हणून साजरा करण्याचे ठरविल्या बद्दल शासनाचे अभिनंदन करण्याचा मांडलेल्या ठरावावर झालेल्या चर्चेंतर्गत श्री तावडे बोलत होते.
श्री तावडे पुढे म्हणाले, मराठी भाषा गौरव दिनानिमीत्ताने राज्यातील सर्व शाळांमधून मराठी अभिमान गीत गायले गेले. यात सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सकाळी 11 वाजता तर दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी दुपारी 4 वाजता हे गीत गायले. एकूण सुमारे 1.5 कोटी विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला आहे. केंद्र शासनाच्या आय सी एस सी बोर्डाच्या शाळेतून आठवीपर्यंत मराठी आवश्यक केली आहे. मात्र आता दहावी पर्यंत मराठी असावी या सभागृहातील सदस्यांच्या मागणी संदर्भात निर्णय अभ्यास मंडळामार्फत घेण्यात येईल. शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढावा यासाठी प्रत्येक विभागामार्फत त्यांच्या विभागाशी संबधित वापरावयाच्या शब्दांची शिफारस मागविण्यात आली असून वर्षभरात याबाबतचे संकलन पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठी भाषा लोकाभिमुख होऊन ती ज्ञान भाषा व्हावी याकरिता शासनाने मराठी भाषेच्या विकास प्रक्रियेस चालना द्यावी , अशी शिफारस मराठी भाषा दिनानिमीत्ताने विधान परिषदेने शासनाला केली आहे.
याविषयावरील चर्चेत परिषद सदस्य सर्वश्री कपील पाटील, शरद रणपिसे, सुनील तटकरे, प्रविण दरेकर, धनंजय मुंडे आणि डॉ .नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला.
****
No comments:
Post a Comment