* गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा आढावा
नागपूर,दि.27 : गोसीखुर्द राष्ट्रीय पाटबंधारे प्रकल्पांतर्गत नागपूर तसेच भंडारा जिल्ह्यातील जागेवर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प तयार करण्याकरिता संबंधित विभागामार्फत प्रस्ताव सादर करण्याच्यासूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात गोसीखुर्द राष्ट्रीय पाटबंधारे प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातील ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार सर्वश्री बच्चू कडू, सुधीर पारवे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी सुधीर धिवसे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, भंडाऱ्याचे मुख्य कार्य पालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ए. व्ही. सुर्वे, मुख्य अभियंता ए. आर. कांबळे, मासेमारी संघाचे प्रतिनिधी संजय केवट, तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत पुनर्वसन करतांना मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासोबतच शेतकऱ्यांना जमीन, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला आदी विविध विषयावर चर्चा झाली.
सौरऊर्जा प्रकल्प निर्मितीला प्राधान्य दिल्यास प्रकल्पास स्वतंत्र वीज पुरवठा करता येणे शक्य होईल. किमान 3 रुपये दराप्रमाणे सौरऊर्जा प्रकल्पातून वीज निर्मिती करून शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचामोबदला दिला जावा, अशा पद्धतीचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.
प्रश्न सोडविण्यासाठी शिबिर
प्रकल्पग्रस्तांच्या वैयक्तिक प्रश्नासंदर्भात भंडारा तसेच नागपूर जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शिबीराचे आयोजन करून तेथे गावकऱ्यांच्या समस्यांचे निराकरणकरण्यात येईल. अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
*****
No comments:
Post a Comment