एस.पी.मंडली यांच्या के.ए.पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेला 75 वर्षे पूर्ण
मुंबई दि 19 : आज भारत विकसनशील देश म्हणून उदयाला येत आहे. भारतामध्ये वेगवेगळया क्षेत्रात होणारे प्रयोग, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेत आहेत. नवा भारत निर्माण करीत असताना तंत्रज्ञानाबरोबरच आपली भारतीय संस्कृती आणि इतिहासाचेही जतन होणे आवश्यक असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यैकंय्या नायडू यांनी स्पष्ट केले.
एस.पी.मंडली यांच्या के.ए.पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेला आज 75 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने षण्मुखानंद हॉल येथे आयोजित कार्यक्रमासाठी भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यैकंय्या नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आमदार माधुरी मिसाळ, संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल जैन आणि प्राचार्य शोभना वासुदेवन व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या भाषणात उपराष्ट्रपती म्हणाले की, शिक्षणामुळे रोजगार मिळण्याची, स्वत:ला सिध्द करण्याची संधी मिळते. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास टिकविणे, त्याचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. प्रगतीची कास धरीत असताना भारताचा इतिहाससुध्दा प्रत्येक विद्यार्थ्यांने वाचणे आवश्यक आहे.
भारताची तरुण देश म्हणून ओळख
आज भारताची तरुण देश म्हणून ओळख होत आहे कारण भारताच्या लोकसंख्येपैकी 65 टक्के लोकसंख्येचे सरासरी वय 35 वर्ष आहे. त्यामुळे हीच लोकसंख्या भारताची ताकद आहे. आज भारत एक शक्तिशाली देश म्हणून जगासमोर येत आहे. पण असे असले तरी आपल्या भारतीय संस्कृतीचे, परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे ही सुध्दा आपली जबाबदारी आहे आणि आजच्या युवकांनी हेच समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या समाजाचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक परंपरेचे काहीतरी देणे लागतो ही भावना सर्वांनी आपल्यामध्ये रुजवणे आवश्यक आहे. आपले संस्कार आणि सर्वांना सामावून घेण्याची परंपरा यामुळेच आज भारत एकसंघ देश म्हणून ओळखला जातो आहे.
आज भारत महासत्तेकडे वाटचाल करीत असला तरी अजूनही 25 टक्के लोकसंख्या ही दारिद्रयरेषेखाली आहे तर 25 टक्के लोकसंख्येला अजूनही लिहिता वाचता येत नाही, अशावेळी भारतीयांमध्ये असलेली क्षमता, बुध्दी आणि हुशारी यांचा वापर करुन या समस्या कशा सोडविता येतील हे आजच्या तरुणांनी पाहणे आवश्यक आहे. भारताच्या लोकसंख्येमध्ये जवळपास 50 टक्के लोकसंख्या महिला वर्गाची आहे. त्यामुळे सशक्त भारत निर्माण करीत असताना महिलांना समान संधी मिळणे आवश्यक आहे. दहशतवाद हा माणुसकीचा सर्वात मोठा शत्रू असतो. त्यामुळेच आपल्याला मिळणारे स्वातंत्र्य अबाधित ठेवत असताना दहशतवाद कुठेही खपवून घेतला जाणार नाही. कोणतेही प्रश्न बंदूक आणि तलवार घेऊन सुटणार नाहीत तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे बॅलेटने सुटू शकतात, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. देशाची प्रगती करण्याचे काम फक्त सरकारचे नाही तर आपले सुध्दा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. जेव्हा कोणत्याही कामामध्ये सर्व यंत्रणा एकत्रितपणे काम करतात तेव्हा त्यात मिळणारे यश हे 100 टक्के असते.
या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा
उपराष्ट्रपती एम. व्यैकंय्या नायडू यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी आयुष्यात यश मिळविण्यासाठी या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा असे सांगितले. पहिली म्हणजे आपल्या आईला कधी विसरु नका, दुसरी आपल्या जन्मभूमीचा आदर ठेवा, तिसरी म्हणजे आपल्या मातृभाषेवर प्रेम करा, चौथी आपल्या मातृदेशाचा आदर करा आणि पाचवी म्हणजे आपल्या शिक्षकांचा, गुरुंचा सन्मान करा. आज आपल्याला सर्व काही इंटरनेटवर मिळते पण शिक्षक आणि गुरुमुळे मिळणारे ज्ञान वेगळेच असते.
मातृभाषेचा न्यूनगंड बाळगू नका
आपण मातृभाषेत जास्त चांगल्या प्रकारे आपले म्हणणे मांडू शकत असल्याने आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड बाळगू नका. आपले म्हणणे कोणत्या भाषेत मांडले जाणे हे महत्वाचे नसून आपल्याला नेमके काय सांगायचे आहे हे महत्वाचे आहे. आपल्या मातृभाषेचा आदर करणे आवश्यक आहे. इतर भाषा शिकणे आवश्यक आहेच पण असे करीत असताना मातृभाषा म्हणजे आपले डोळे तर इतर भाषा हा आपला चष्मा आहे, हे लक्षात ठेवा, असा सल्लाही श्री. नायडू यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
उपराष्ट्रपती एम. व्यैकंय्या नायडू यांच्या हस्ते ‘कल आज और कल’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. आमदार श्रीमती मिसाळ यांनी आगामी काळात शिक्षण क्षेत्रात संस्थेचे योगदान काय असणार याबाबत माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल जैन यांनी गेल्या 75 वर्षात संस्थेने केलेल्या वाटचालीबाबत माहिती दिली. प्राचार्य शोभना वासुदेवन यांनी आभार मानले.
000000


No comments:
Post a Comment