Monday, 19 March 2018

महिलांकरिता स्वच्छतागृहांची व्यवस्था न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार

मुंबई, दि. 19: कामगार विभागाच्या अधिनस्त कार्यालयात महिलांकरिता स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याच्या सूचना कामगार विभागाच्या सर्व अधिनस्त कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. कारखाने अधिनियमानुसार सर्व कार्यालयांनी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था न केल्यास त्या आस्थापनांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
महिला धोरण, 2014 ची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने कामगार विभागाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, कारखाने आणि आस्थापना येथे महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कारखाने अधिनियम, 1948 च्या कलम 19 मध्ये देखील महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये देखील महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहे असण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या दोन्ही अधिनियमातील तरतूदींची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना कामगार विभागाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. सदर तरतूदींची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
००००

No comments:

Post a Comment