Friday, 6 July 2018

विधीमंडळाच्या कामकाजात पावसामुळे व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घ्या - डॉ. अनंत कळसे


*  अतिवृष्ट्रीमुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीची पाहणी
*  विद्युत यंत्रणा सुरक्षीत राहील या दृष्टीने उपाययोजनेची अंमलबजावणी करा

नागपूर, दि. 6 : अतिवृष्टीमुळे विधानभवन परिसरात पाणी साचल्यामुळे विद्युत यंत्रणा बंद करावी लागली. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय निर्माण झाला. अशा प्रकारची परिस्थिती भविष्यात कधीही घडणार नाही यादृष्टीने तात्काळ उपाययोजनाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना विधीमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांनी आज दिल्या.
            विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात पावसाचे पाणी साचल्यामुळे निर्माण

झालेल्या परिस्थितीचा आढावा तसेच त्यावर करावयाच्या कायमस्वरुपी उपायाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधीमंडळ सचिवालयाचे उत्तमसिंग चव्हाण, सहसचिव अ.ना. मोहिते, उपसचिव बि.गो.आठवले, अवर सचिव रविंद्र जगदाडे तसेच विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त विरेंद्र सिंग, अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता आर.आर. अक्कुलवार, अधीक्षक अभियंता पी.डी.नवघरे, कार्यकारी अभियंता जर्नादन भानुसे, सहायक अभियंता चंद्रशेखर गिरी आदी उपस्थित होते.
            नागपूर येथे यापूर्वी तीन पावसाळी अधिवेशन झाले असून हे चौथे अधिवेशन आहे. या अधिवेशनात अतिवृष्टी झाल्यामुळे या परिसरातील इलेक्ट्रीकल पॅनल असलेल्या कक्षात पाणी साचल्यामुळे विद्युत यंत्रणा बंद करावी लागली. त्यामुळे सभागृहाचे बांधकाम स्थगित करण्यात आले. अशा प्रकारची घटना यापुढे कधीही होणार नाही यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग तसेच महानगरपालिका यांनी संयुक्तपणे काय उपाययोजना करता येईल तसेच या उपाययोजना दोन दिवसात पूर्ण करण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी सूचना करण्यात आली.
            सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विद्युत पुरवठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्वीच पॅनल कक्षात पाणी जाणार नाही यादृष्टीने संरक्षण भिंत बांधून तेथे 24 तास आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. आवश्यकतेनुसार पाणी काढण्यासाठी पंप तयार ठेवण्यात येतील, असे मुख्य अभियंता श्री. देबडवार यांनी यावेळी सांगितले.
            विधानभवन परिसरातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल यादृष्टीने महानगरपालिकेतर्फे सर्व नाल्यांची दुरुस्ती करणे, तसेच ज्या भागात त्या भागाचे खोलीकरण करण्यात येणार असून या परिसरात कुठेही पाणी न साचता नाल्यांमधून बाहेर काढण्यासाठी महानगरपालिकेतर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात येईल. यासाठी आवश्यक तज्ज्ञांकडून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबत महानगरपालिका आयुक्त विरेंद्र सिंग यांनी सांगितले.
            नागपूर शहरात व जिल्ह्यात केवळ सहा तासात 267.5 मि.मी. पाऊस पडला असून यापुढेही अतिवृष्टी होण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्या संदर्भात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.
यावेळी बैठकीनंतर विधानभवन परिसराची पाहणी करण्यात आली.
*****

No comments:

Post a Comment