Tuesday, 6 November 2018

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत 4 लक्ष 74 हजार बालकांना देणार लस - अश्विन मुदगल

नागपूर, दि. 06लहान बालकांच्या मृत्युस कारणीभूत गोवर तसेच रुबेला या संसर्गजन्य आजारावर नियंत्रणासाठी महिनाभर विशेष मोहिम राबविण्यात असून यामध्ये जिल्ह्यातील 4 लक्ष 74 हजार बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. 
            गोवर हा विषाणूजन्य आजार असून यामुळे बालकांचा मृत्यु संभवतो. रुबेला हा विषाणूजन्य तसेच संसर्गजन्य आजार आहे. गोवरप्रमाणेच रुबेलाची लक्षणे असतात. लहान बालके तसेच गर्भवती महिलेस रुबेलाचा संसर्ग झाल्यास जन्मजात बालकामध्ये रुबेला सिंड्रोम होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा आजार गर्भासाठी तसेच नवजात बालकांसाठी घातक ठरु शकतात. 
देशात गोवर-रुबेला आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने 9 ते 15 वर्षे वयोगटातील बालक तसेच मुलांकरिता राज्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. एक महिना राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमध्ये 4 लक्ष 74 हजार 658 बालकांना लस देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील विविध शाळा व दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडीमध्ये बालकांना लस देण्यात येणार आहे.
लसीकरण मोहिमेंतर्गत 147 वैद्यकीय अधिकारी, 5 जिल्हास्तरीय अधिकारी, 8 जिल्हा पर्यवेक्षक, 8 तालुका अधिकारी, 41 आरोग्य सहाय्यिका, 57 आरोग्य सहाय्यक, 264 आरोग्य सेविका, 170 आरोग्य सेवक, शिक्षक व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदीचा सहभाग आहे.
जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून या मोहिमेवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. 9 ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना गोवर-रुबेला लस देण्यात यावी, पालकांनी लस देण्याबाबत कुठलीही शंका बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यासह जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद गणवीर यांनी केले आहे.
**** 

No comments:

Post a Comment