मुंबई, दि. 29 : अस्तित्वात असलेल्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्राकडे शिफारस करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. सदस्य शरद रणपिसे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यातील धनगर समाजाला सध्या भटक्या जमाती या प्रवर्गात आरक्षण आहे. मात्र त्यांना अनुसूचित जमाती या प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला धनगर समाजाबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या संस्थेने याबाबतचा सर्वंकश अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालावर आधारित शिफारसी केंद्राला सादर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. धनगर समाजाचा प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण अभ्यासाअंती शिफारशी पाठविण्यात येतील. संविधानातील तरतुदींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य धनंजय मुंडे, रामहरी रुपनवर, हरिभाऊ राठोड यांनी सहभाग घेतला.
***
No comments:
Post a Comment