नागपूर दि. 3 : लोकशाही बळकट करण्यासाठी दिव्यांग आणि अपंगांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग असणे गरजेचे आहे. त्यांच्या समावेशामुळे लोकशाही शासन व्यवस्था अधिका बळकट आणि सक्षम होईल, असे मत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केले.
जिल्हा निवडणूक कार्यालय, नागपूर व जिल्हा व अपंग पुनर्वसन केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे अपंग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला उपजिल्हा निडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, सुजाता गंधे, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प अधिकारी अभिजित राऊत, विनोद आसुदानी, अशोक मुन्ने, मानव विकास संस्थेचे राजाभाऊ जोध तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
2015 पासून निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा समावेश व्हावा, यासाठी सुगम्य भारत अभियान सुरु करण्यात आले.
तसेच शासनाच्या वतीने 2016 मध्ये कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार त्यांना अनेक सुविधा पुरविण्यात आल्या. तसेच शासकीय नोकरीमध्येही त्यांचा समावेश करण्यात आला. यामुळे दिव्यांग व्यक्तींचा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यास मदत झाली. असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगीतले.
दिव्यांगांचा मतदान यादीत समावेश होण्यासाठी नागपूर शहरातील 6 विधानसभा मतदार संघातल सर्व मतदान नोंदणी अधिकारी कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्यांना निवडणूक केंद्रापर्यंत पोहचवताना कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी व्यक्त केले.
अपंग आणि दिव्यांग व्यक्ती हा समाजाचा घटक आहे. त्यांना समाजाकडून सर्वसमावेशक सहकार्य मिळाल्यास त्यांना जीवन जगणे सुलभ होईल. शासनाने दिव्यांगांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाचे आम्ही दिव्यांग स्वागत करीत आहोत. मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविण्यामध्ये आमचा सहभाग राहीलच. परंतु आम्हाला लोकशाही प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणूनही संधी उपलब्ध करुन द्यावी, असे विनोद आसुदानी यावेळी म्हणाले.
जीवनात अपंगत्व आले म्हणून निराश न होता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यावर मात करावी, असे मत श्री. मुन्ने यांनी व्यक्त केले. आज बचत भवन येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये शंभर दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासुदकर यांनी केले. तर आभार उपजिल्हाधिकारी जगदिश कातकर यांनी मानले.
*****
No comments:
Post a Comment