नागपूर, दि.17: खरीप हंगाम सुरु झाला असून, येत्या काळात जैविक पध्दतीने वेळेतच किडींचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीने वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) अंतर्गत ट्रायकोकार्डशी संबंधित वेबिनारचे (ऑनलाईन प्रशिक्षण) शेतकऱ्यांसाठी शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी वेबिनारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन वनामतीचे संचालक रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
शेतकरी बांधवांनी स्थानिक स्तरावरच मोठ्या प्रमाणात ट्रायकोकार्डची निर्मिती करुन त्याचा ताबडतोब शेतात उपयोग करता येण्याच्या उद्देशाने, मागील वर्षी वनामती संस्थेत छोट्या प्रमाणात ट्रायकोकार्ड लॅब तयार करण्यात आलेली आहे. या वेबिनारमध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना “ट्रायकोकार्डचे फायदे व घरच्या घरी ट्रायकोकार्ड तयार करण्याची पध्दत” या विषयावर माहिती देण्यात येणार आहे. या लॅबमध्ये शेतकरी बांधवांना घरच्या घरी ट्रायकोकार्ड तयार करण्याच्या पध्दतीचे प्रात्यक्षिक देण्यात येते. मागील वर्षी 200 पेक्षा जास्त शेतकरी बांधवानी प्रत्यक्ष वनामती संस्थेत येऊन या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.
सध्याच्या कोविड19 च्या प्रादुर्भावामुळे संस्थेत प्रशिक्षण आयोजित करणे शक्य नसल्याने यावर्षी वनामतीने शनिवारी (20 जून) दुपारी 12 वाजता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वेबिनारचे आयोजन केले आहे. वेबिनारशी संबंधित अधिक माहितीसाठी उपसंचालक प्रभाकर शिवणकर (956164501,9422133744) व प्रशिक्षण समन्वयक श्रीमती सीमा मुंडले (9284640731) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment