Tuesday, 5 August 2025

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दोन दिवशीय महसूल परिषदेचा समारोप

नागपूर दि.3: महसूल विभाग खऱ्या अर्थाने राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता, पारदर्शकता व तत्परतेने सेवा देणारा म्हणून या विभागाची ओळख आहे. सध्या राज्यातील जनतेला सर्वाधिक ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देणारा हा विभाग असून अधिक लोकाभिमुखतेसाठी महसूल परिषदेत अभ्यास गटांनी सादर केलेल्या शिफारशी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दिशादर्शक ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल परिषदेच्या समारोप प्रसंगी व्यक्त केला.

येथील भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम) येथे आयोजित महसूल परिषदेच्या दुसऱ्या दिवशी झालेला चर्चासत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.  यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महसूल विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कालानुरूप महसूल विषयक कार्यप्रणालीशी संबंधित धोरणात्मक बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून तंत्र कौशल्याच्या बळावर हा विभाग अधिकाधिक सक्षम व लोकस्नेही करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. या सर्व धोरणात्मक बाबींवर चर्चा, मंथन व मूल्यमापन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महसूल परिषदेचा समारोप श्री. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आला.

येथील वेगवेगळ्या कक्षात मुख्यमंत्री, महसूल मंत्री, मुख्य सचिव व अपर मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत घेतलेल्या बैठकांतून आवश्यक ती माहिती जाणून घेतली. या परिषदेत विभागीय आयुक्त प्रमुख असलेल्या समित्यांकडून विविध अहवाल सादर करण्यात आले. महसुली कामकाजात सुसूत्रता व गतिमानता आणण्यासाठी आवश्यक त्या बाबी त्यांनी  मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. महसुली सेवा व योजनांच्या लाभांपासून एकही नागरिक वंचित राहू नये यासाठी अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यासोबतच त्यात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सादरीकरणाच्या माध्यमातून महत्वपूर्ण बाबी समितीकडून मांडण्यात आल्या. या विषयाचा शासनास सादर करण्यात येणारा अहवाल अचूक व निर्दोष असावा यासाठी प्रत्येक बाबींचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

           परिषदेतील विचारमंथन दिशादर्शक

            दैनंदिन जीवनात सामान्य नागरिकांना विविध कामांच्या निमित्ताने वारंवार महसूल विभागाशी संपर्क साधावा लागतो. या परिषदेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या धोरणात्मक बाबी केवळ जिल्हा मुख्यालय स्तरावरच नव्हे तर उपविभाग व तालुकास्तरावरही सर्वांसाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होणार असल्याची भावना महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या परिषदेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कल्पना, विविध उपाययोजना व उपक्रमांच्या माहितीचे आदानप्रदान झाले असून यातून प्रशासनात नवी कार्यपद्धती अस्तित्वात येईल. तसेच ही परिषद विभागाच्या भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरणार असल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

00000000

 


No comments:

Post a Comment