Friday, 12 September 2025

वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत विभागात 1 कोटी 68 लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन - विजयलक्ष्मी बिदरी

 


·         विभागात 1 कोटी 10 लक्ष वृक्षलागवड पूर्ण

·         30 सप्टेंबर पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करणार

नागपूर, दि. 12 :  राज्यात राबविण्यात येत असलेल्या दहा कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत नागपूर विभागात 1 कोटी 68 लक्ष वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले असून यापैकी 1 कोटी 10 लक्ष वृक्षलागवड पूर्ण झाली आहे. वृक्षलागवड मोहिमेचे उद्दिष्ट येत्या 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.

दहा कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत विभागातील सर्व जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिम राबविण्यात येत आहे. विभागाला दिलेल्या उद्दिष्टापैकी सरासरी 87 टक्के वृक्षारोपण पूर्ण झाले आहे. विभागात 1 कोटी 26 लक्ष वृक्षलागवडीचे जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले होते. ही मोहिम 20 हजार 487 नोंदणीकृत ठिकाणांवर राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये 29 हजार 065 संस्थांनी आपला सहभाग नोंदवीला असल्याचे श्रीमती बिदरी यांनी सांगितले.  

वृक्षारोपण मोहिमेमध्ये जिल्हानिहाय करण्यात आलेल्या वृक्षारोपणामध्ये नागपूर जिल्ह्यात 10 लक्ष 57 हजार वृक्षलागवड करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात 7 लक्ष 99 हजार, गोंदिया जिल्ह्यात 14 लक्ष, भंडारा जिल्ह्यात 5 लक्ष, चंद्रपूर जिल्ह्यात 32 लक्ष तर गडचिरोली जिल्ह्यात 42 लक्ष वृक्षलागवड पूर्ण झाली आहे. वृक्षलागवड मोहिमेचे जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले असून येत्या 30 सप्टेंबर पर्यंत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन, वनविभाग तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय संस्थांना दिल्या असल्याची माहिती यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.

रिक्त पदे भरण्याला प्राधान्य

        नागपूर विभागात रिक्त असलेल्या नायब तहसिलदार या पदाच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून  57 पदांसाठीची शिफारस शासनाला करण्यात आली आहे. या पदोन्नतीच्या प्रक्रियेमधील दिव्यांगामधून पात्र असलेल्या 15 पदांचा तसेच नियमित मंडळ अधिकारी, तदर्थ मंडळ अधिकारी व अव्वल कारकून संवर्गातील एकूण 42 पदांचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.    

अनुकंपातत्वावरील 1 हजार 250 उमेदवारांची निवड

        अनुकंपातत्वारील रिक्त असलेल्या वर्ग 3 व वर्ग 4 या क्षेणीतील सूमारे 1 हजार 250 पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सेवा पंधरवाडाअंतर्गत नियुक्ती पत्र देण्यात येणार आहेत.

अनुकंपातत्वावरील वर्ग 3 व वर्ग 4 या क्षेणीतील रिक्त असलेल्या पदांवर नियुक्तीसाठी जिल्हानिहाय विशेष मोहिम राबविण्यात आली होती. त्याअंतर्गत पात्र असलेल्या वर्ग 3 या संवर्गातील 424 तर वर्ग 4 या संवर्गातीलल 826 पदांचा समावेश आहे. या पदांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आदी विभागातील रिक्त पदांचा समावेश आहे.

एमपीएससीद्वारे विभागात 675 उमेदवारांची निवड

        महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे वर्ग 3 (लिपिक) या पदासाठी नागपूर विभागात 675 उमेदवारांची निवड झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सेवा पंधरवाडाअंतर्गत जिल्हानिहाय नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. विभागात एमपीएससीद्वारे सरळसेवा भरती तसेच अनुकंपातत्वावरील गट क व गट ड या संवर्गातील पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.

 

00000

No comments:

Post a Comment