Ø सर्वोत्तम तीन जिल्ह्यांची होणार निवड
Ø प्रत्येक जिल्ह्यात दोन नाविन्यपूर्ण
उपक्रम राबविणार
नागपूर,दि.१२ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व
अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांच्या जयंतीपर्यंत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान नागपूर विभागातील सर्व
जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रम राबवून तीन टप्प्यात ‘सेवा पंधरवडासाजरा होणार आहे. विभागातील
अनुकंपा तत्वावरील गट ‘क’आणि गट ‘ड’ पदांसाठी १२५० तर सरळसेवेद्वारे लिपीक पदावरील
६७५ उमेदवरांना पंधरवडया दरम्यान नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.सेवा पंधरवडयातील
उपक्रमांची प्रभावी अमंलबजावणी करणाऱ्या तीन सर्वोत्तम जिल्ह्यांची निवड करण्यात येणार
असल्याची माहिती, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे दिली.
पहिल्या
टप्प्यात पाणंद रस्त्यांबाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.याअंतर्गत गावांच्या
पाणंद किंवा शिवरस्त्यांचे सर्वेक्षण करणे व त्यांना क्रमांक देण्याचे काम प्राधान्याने
करण्यात येणार आहे.यासोबतच नोंद नसलेल्या रस्त्यांची नोंद घेण्याचे आणि शेतरस्त्यांच्या
सीमांकन व रस्त्यांविषयीच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता सीमांकन व रस्ता अदालतांचे
आयोजन करण्यात येणार आहे.
दुसऱ्या
टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रम राबविण्यात
येणार आहे. उपक्रमांतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ या शासकीय निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी
करून बेघरांना घर देण्याचे उद्दिष्टय ठेवण्यात आले आहे. शासकीय जमिनीवर गृहनिर्माणासाठी
कब्जाहक्काने जमीन वाटप करणे, झोपडपट्टी व इतर अनधिकृत बांधकामांचे नियमशीरकरण करणे
आणि पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात येणार आहे.
वर्धा
जिल्ह्यात विशेष उपक्रमांतर्गत वनहक्क धारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत
जनजागृती करून लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील ७/१२
जीवंत करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.विशेष उपक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यात
‘लक्ष्मी मुक्ती’ ही अभिनव योजना राबविण्यात येणार आहे.याअंतर्गत शेतीच्या अभिलेख्यांवर
पत्नीचे नाव नोंदविण्यात येणार आहे.यासोबतच दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच धान्य वाटप
करण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
२ हजार उमेदवारांना पालकमंत्र्यांच्या
हस्ते नियुक्तीपत्र
नागपूर विभागातील
६ जिल्ह्यांमधील अनुकंपा तत्वावरील रिक्त जागा भरण्याची महत्वाची कार्यवाही सेवा पंधरवडयामध्ये
२५ ते ३० सप्टेंबर दरम्यान होणार आहे.यानुसार गट ‘क’ च्या ४२४ आणि गट ‘ड’ च्या ८२६ अशा एकूण १२५० तसेच महाराष्ट्र लोकसेवा
आयोगाकडून निवड झालेल्या विभागातील ६७५ लिपीक प्रवर्गातील उमेदवारांना पालकमंत्री
यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.
सर्वोत्तम
तीन जिल्ह्यांची होणार निवड
सेवा
पंधरवडा दरम्यान नियोजित कार्यक्रम व उपक्रमांची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या तीन
जिल्ह्यांची निवड करण्यात येणार आहे. या सदंर्भातील पर्यवेक्षणासाठी विभागीय आयुक्तालयातील
अधिकाऱ्यांची जिल्हा निहाय संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर
जिल्हयासाठी प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतियेळे,भंडारासाठी सह आयुक्त
(पुनर्वसन) प्रदीप कुलकर्णी, वर्धा जिल्ह्यासाठी अपर आयुक्त (महसूल) राजेश खवले, चंद्रपूरसाठी
अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) तेजूसिंग पवार, गडचिरोलीसाठी सह आयुक्त (रो.ह.यो.) अविनाश
हरगल आणि गोंदियासाठी सह आयुक्त (करमणूक) तुषार
मठकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध मानकांवर सरस कामगिरी करणाऱ्या तीन जिल्ह्यांची
नावे विभागीय आयुक्त कार्यालयाद्वारे मुख्यालयास पाठविण्या येणार असून यातील एका जिल्हयाची
सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून निवड करण्यात येणार असल्याचे श्रीमती बिदरी यांनी सांगितले.
०००००
No comments:
Post a Comment