नागपूर, दि. 8: दैनंदिन शासकीय कामकाजामध्ये सूसुत्रता व गतिमानता
येण्यासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबाबदारी, सहभाग आणि योगदान या त्रिसूत्रीवर
कार्य करण्याचा संदेश सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी के.एन.के.राव यांनी आज माहिती
व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे
संचालक कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कार्यालयीन कार्यपद्धती आणि मसुदा लेखन कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाचे सर्व कार्यालये राज्यभर कार्यरत असून जनतेपर्यंत शासनाची अधिकृत माहिती
पोहचविण्याचे महत्वपूर्ण कार्य या विभागाद्वारे केले जाते. या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी
परिणामकारक कार्य करण्याकरिता जबाबदारीने कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे श्री. राव
यांनी सांगितले. कार्यालयाच्या विविध विभागांमध्ये पत्र दाखल होण्यापासून त्यावरील
शेरा आणि पुढे टिपणी पर्यंतचा प्रवास व त्यासाठी नियमांचे करावयाचे पालन आदी बाबी स्पष्ट
करतांना सहभागीता आणि योगदान या विषयी सविस्तर माहिती दिली. कार्यालयीन नस्ती व त्याचे
विविध प्रकरणे, टिपणीचा मसुदा व त्यातील बारकावे आणि तांत्रिकबाबी त्यांनी उदाहरणासहित
समजावून सांगितल्या. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उदाहरणांसह
श्री. राव यांनी उत्तरे दिली.
कार्यालयीन व प्रशासकीय कामांमध्ये
अचुकता, गतिमानता व नियमांची माहिती सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना होण्यासाठी या कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आल्याची भूमिका संचालक (माहिती) नागपूर-अमरावती विभाग डॉ. गणेश मुळे
यांनी प्रास्ताविकात मांडली. सहायक संचालक पल्लवी धारव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
केले व आभार मानले. संचालक डॉ. गणेश मुळे अध्यक्षस्थानी होते. माहिती अधिकारी रितेश
भुयार, माहिती अधिकारी अतुल पांडे, माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर आदी यावेळी उपस्थित
होते.
00000
No comments:
Post a Comment