Sunday, 12 October 2025

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा - महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 


 रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान 

नागपूर, दि. 12 :  जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री रोजगार मेळाव्याचे आयोजन सुरु आहे. जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी दर महिन्याला हा उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. 

             श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तथा युवा फाउंडेशन व नॅशनल रिअल इस्टेट काउन्सिल (नरेडको) विदर्भच्या वतीने महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे ‘पालकमंत्री रोजगार मेळावा 2.0’ चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते. कोराडीचे सरपंच नरेंद्र धनोले, माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

            रोजगार मेळावा आयोजन समितीने यापूर्वी आयोजित केलेल्या पहिल्या रोजगार मेळाव्यात 136 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केली होती. उपक्रमातील आजचा हा दुसरा मेळावा असून यातही युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत दर महिन्याला रोजगार मेळावा आयोजित करून जास्तीत-जास्त रोजगार उपलब्ध करून द्यावा व पुढील रोजगार मेळाव्याची तयारी आतापासूनच सुरू करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. मेळाव्यात सहभागी कंपन्याच्या प्रतिनिधींचे आभार मानत यापुढेही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

            पालकमंत्री रोजगार मेळाव्यासाठी 1 हजार युवक-युवतींनी नोंदणी केली. यातील 500 जणांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊन विविध क्षेत्रातील 16 कंपन्यांसाठी मुलाखती दिल्या. 100 पेक्षा जास्त उमेदवारांना या मेळाव्यात नियुक्तीपत्र देण्यात येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. 

पालकमत्र्यांच्या हस्ते 20 पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप

            या कार्यक्रमातच महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामठी तालुक्यातील नांदा गावातील 20 पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात आले.

 

000000


Tuesday, 7 October 2025

देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्थाच्या ‘ब’ श्रेणीत ‘नागपूर फ्लाईंग क्लब टॉप टेन’ मध्ये

 

 

डिजीसिएचे नामांकन जाहीर 

 

नागपूर, दि.७ :- केंद्र शासनाच्या नागरी विमान महासंचालनालयाच्या (डिजीसिए) तर्फे भारतातील ब श्रेणीतील उत्कृष्ट विमान चालक प्रशिक्षण संस्थांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. यात राज्य शासनाच्या नागपूर फ्लाईंग क्लबला ब श्रेणीमध्ये टॉप टेन नामांकन जाहीर करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाईंग क्लबच्या अध्यक्ष श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली. 

नागपूर फ्लाईंग क्लबचे महाराष्ट्र शासनातर्फे संचलन करण्यात येत असून या क्लबकडे चार प्रशिक्षणार्थी विमान आहेत. केंद्र शासनाच्या भारतीय नागरी विमान महासंचालनालयातर्फे उड्डान प्रशिक्षणाकरिता मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नागपूर येथे प्रशिक्षणासाठी पुरेशा वेळ उपलब्ध होत नसल्याने चंद्रपूर येथील मोरवा विमानतळावर दुसरा बेस तयार करण्यात आला आहे. मोरवा विमानतळावरील प्रशिक्षणालाही डिजीसिएची उड्डाण प्रशिक्षणाकरिता मान्यता मिळाली आहे. फ्लाईंग क्लबच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अपर आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक तेजुसिंग पवार यांच्याकडे आहे. 

भारतातील मान्यता प्राप्त विमान प्रशिक्षण संस्थांमध्ये असलेल्या सुविधा संदर्भात नागरी विमान महासंचालनालयातर्फे नामांकन यादी जाहीर करण्यात येते. दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर  करण्यात आलेल्या नामांकनातील प्रत्यक्ष विमान प्रशिक्षणासंदर्भातील वर्गवारीनुसार ब श्रेणीमध्ये एकूण १३ संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर फ्लाईंग क्लब दहाव्या क्रमांकावर आहे. 

मोरवा विमानतळावर प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व सूविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ पासून ८३५ पेक्षा जास्त तास उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी सेसना-१५२ या श्रेणीतील तीन विमाने तर सेसना-१७२ या श्रेणीतील एक विमान आहे. प्रत्येक प्रशिक्षण तुकडीत ४२ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा समावेश असून यापैकी वाणिज्य विमान प्रशिक्षणासाठी ३७ तर वैयक्तिक प्रशिक्षणासाठी ५ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. अल्पावधितच नागपूर उड्डाण क्लबने प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्था पूर्ण केल्यामुळे भारत सरकारच्या नागरी विमान महासंचालनालयातर्फे ब श्रेणीमध्ये समावेश होऊन पहिल्या दहा मध्ये रँकिग मिळविली असल्याचे श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.

    

००००००

 


महर्षी वाल्मिकी यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 

 

        नागपूर, दि.07 :  आदिकवी व रामायण महाकाव्याचे रचेते महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. 

आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार  यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

00000

 

 

 

‘नागपूर ग्रोथ हब किक कार्यशाळा’ आयोजनाबाबत बैठक - विविध पाच गटांमध्ये होणार विचारमंथन ; मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन

 


 

 

नागपूर, दि.७ :- विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये नागपूर व परिसराच्या आर्थिक विकासासाठी  कार्यपद्धती आखण्याच्या दृष्टीने येत्या १२ ऑक्टोबर रोजी नागपूर स्थित भारतीय व्यवस्थापन संस्थेमध्ये (आयआयएम) ‘नागपूर ग्रोथ हब किक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत  नागरी क्षेत्र विकास, उद्योग, कृषी, वने, खाण या पाच गटांमध्ये तज्ज्ञ मंडळी विचार मांडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारोप सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. 

राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) चे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे नागपूर ग्रोथ हब किकच्या आयोजनाबाबत आज बैठक झाली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार परिणय फुके आणि सुमित वानखेडे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. 

नागपूर व परिसरातील उपलब्ध स्त्रोतांचा प्रभावी उपयोग करुन विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक थिंक टँक निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. वाढते नागरीकरण व भविष्यातील उद्दिष्टे यांची सांगड घालणे, मिहान परिसरात सुरु असलेले विविध उद्योग तसेच नागपूर व परिसरात विविध उद्योगांची श्रृंखला व त्याची वाढ करणे, या भागातील कृषी व कृषी आधारित उद्योगांच्या विकासासाठी कार्यपद्धती तयार करणे, वने व वन्यजीव क्षेत्रामध्ये रचनात्मक कार्य करुन विकास साधणे, कोळसा व खनिजांनी समृद्ध असलेल्या या भागाचा विकास साधण्यासाठी महत्वाची पावले उचलण्यासंदर्भात तज्ज्ञ मंडळीचे गट स्थापन करण्याबाबत यावेळी सूचना करण्यात आल्या. या कार्यशाळेच्या अनुषंगाने विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. श्रीमती बिदरी, डॉ. विपिन इटनकर आणि डॉ. अभिजित चौधरी यांनी यावेळी विचार मांडले.

  

००००००

 


Monday, 6 October 2025

अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत घडलेल्या गुन्ह्यांचा तपासाला प्राधान्य द्या - विजयलक्ष्मी बिदरी

 

Ø  विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक

Ø  निवृत्तीवेतनासह आर्थिक लाभासाठी 2कोटी 50 लक्ष

Ø  पिडीतांच्या वारसाच्या नोकरीचे प्रस्ताव सादर करा

Ø  विभागात 154 गुन्ह्यांची नोंद 

           नागपूर, दि. 06 : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंद झालेल्या प्रत्येक प्रकरणांचा सखोल तपास करून न्यायालयात अशी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही. याची दक्षता घेतांनाच लाभार्थ्यांना समितीमार्फत आर्थिक लाभाची प्रकरणे तात्काळ निकाली काढा असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले. 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत घडलेल्या प्रकरणांचा आढावा विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्रीमती बिदरी बोलत होत्या. 

         यावेळी विभागतील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक दृकश्राव्य पद्धतीने तसेच नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक संदिप पाटील, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त प्रसाद कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त एन. के. कुकडे आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

           नागपूर विभागात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 1 एप्रिल पासून 154 गुन्ह्यांची नोंद झाली असून यामध्ये अनुसूचित जातीचे 110 तर अनुसूचित जमातींच्या 44 प्रकरणांचा समावेश आहे.  पोलीस तपासा अभावी तसेच न्याय प्रविष्ठ असलेल्या प्रकरणांसदर्भात तात्काळ चौकशी करून न्यायालयासमोर परिपूर्ण प्रकरणे सादर करण्याला प्राधान्य  देण्याच्या सूचना करतांना श्रीमती बिदरी म्हणाल्या की, ऑगस्ट महिन्यापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात अर्थसहाय्य करण्यासाठी 2कोटी 50 लक्ष रूपयांचा निधीचे वाटप तात्काळ पूर्ण करावे. याअंतर्गत 1 कोटी रूपये निवृत्ती वेतनाकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. 

            दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकी उपविभागीय स्तरावर वर्धा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात नियमित बैठकी घेण्याच्या सूचना करतांना विभागीय आयुक्तांनी मृत झालेल्या कुटुंबांना शासकीय नोकरी संदर्भात प्रलंबित असेलेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासोबत पेंशन संदर्भातही प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

प्रारंभी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी नागपूर विभागात घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील, दाखल झालेले गुन्हे यांतर्गत ॲक्ट्रॉसिटी अंतर्गत न्यायप्रविष्ठ व शिक्षा झालेल्या गुन्ह्यासंदर्भात माहिती दिली. पोलीस तपासांतर्गत 1 वर्षावरील 14 प्रकरणे तर 6 महिन्यापर्यंतच्या 2 प्रकरणासंदर्भात तपास सुरू असल्याचे यावेळी सांगितले. विभागात 78 प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

जादूटोणा विरोधी कायद्याच्या आढावा 

          विभागीयस्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा व कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यासंदर्भात प्राधान्य देण्यात येत असून गडचिरोली, गोंदिया, भंडारा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहूल भागात ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत प्रत्येक नागरिकांपर्यंत या कायद्याची माहिती समितीमार्फत पोहचविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या. 

                जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत नागपूर शहरात 16 तर ग्रामीण भागात 17 अशा 33 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वर्धा 10, भंडारा 15, गोंदिया 11, चंद्रपूर 36 तर गडचिरोली जिल्ह्यात 11 अशा नागपूर विभागात 116 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. प्रत्येक गुन्ह्यासंदर्भात पोलीस विभागातर्फे चौकशी करण्यात येवून न्यायालयात प्रकरणे दाखल करण्यात आली आहे. प्रचार व प्रसिद्धीच्या दृष्टीने विभागात 108 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले. 

तृतीयपंथी यांच्या हक्काचे संरक्षण 

          तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचा आढावा विभागीय आयुक्त यांनी घेतला. तृतीय पंथीयांना आधारकार्ड सह आयुष्यमान कार्ड तसेच संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष शिबीर आयोजित करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी दिल्या.  

                तृतीयपंथी यांच्या हक्काचे संरक्षण करतांना त्यांना आवश्यक सुविधा व सोयी प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले. नागपूर जिल्ह्यात 251 तृतीयपंथीय असून 204 तृतीय पंथीयांना पोर्टलद्वारे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. वर्धा 21, भंडारा 6, गोंदिया 15, चंद्रपूर 35 तर गडचिरोली जिल्ह्यात 5 तृतीयपंथीय असून त्यांना आधारकार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, घरकुल तसेच आरोग्य सेवेचा लाभ देण्यात येत आहे. तृतीयपंथीया संदर्भात समाजामध्ये जागृती करतांनाच आवश्यक सुविधा पुरविण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त प्रसाद कुलकर्णी  यांनी सांगितले.

0000

 

 

 

 

 

 

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुकंपा तत्वावरील व सरळ सेवेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

 


 

शासनाच्या लोककल्याणकारी सेवा जनतेपर्यंत आत्मियतेने

पोहोचविण्यासाठी कटिबद्ध व्हा

                                              - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

Ø  जिल्ह्यातील ९४१ उमेदवारांना विविध विभागांकडून नियुक्तीपत्रे प्रदान

 

नागपूर,दि.4: शासकीय सेवेत आज रुजू झालेल्या उमेदवारांनी प्रामाणिक व पारदर्शीपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना शासनाच्या लोककल्याणकारी सेवा जनतेपर्यंत आत्मियतेने पोहोचवाव्यात असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

 

येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री बावनकुळे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार आशिष देशमुख, आमदार प्रवीण दटके, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त श्रीमती आयुषी सिंह, माजी आमदार सुधाकर कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी व विभाग प्रमुख या कार्यक्रमास उपस्थित होते.

 

श्री. बावनकुळे म्हणाले, राज्यातील प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाद्वारे विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी शासकीय विभागांसाठी १०० दिवस आणि त्यानंतर १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांचा हाती घेतलेल्या कार्यक्रमात राज्यातील भरती प्रक्रिया हा महत्त्वाचा टप्पा होता. त्यानुसार विविध शासकीय विभागांमध्ये भरती प्रक्रियेचा विषय प्राथम्याने हाती घेण्यात आला. आज राज्यभरात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने भरती करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

 

जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात अनुकंपा तत्वावर गट-क च्या १२७ उमेदवारांना, गट-ड १५६, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले ३०३, महापालिकेत सरळ सेवेतून १५६ व लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार महापालिकेतील १९९ अशा एकूण ९४१ उमेदवारांना पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते आज शासकीय नोकरीची नियुक्ती पत्रे ऑनलाइन पद्धतीने प्रदान करण्यात आली. उपस्थितांच्या हस्ते २१ उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात पत्रे प्रदान करण्यात आली.

 

जिल्हाधिकारी इटनकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राज्य शासनाने प्रथम अनुकंपा धोरणाचा अभ्यास केला. त्यात आवश्यक ते बदल करून सामान्य प्रशासन विभागाशी समन्वय साधत हा व्यापक निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर विभागांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल त्यांनी विस्ताराने माहिती दिली.

 

या मेळाव्यात विविध शासकीय विभागांकडून लावण्यात आलेल्या स्टॉल्सवरून संबंधित उमेदवारांनी आपली नियुक्तीपत्रे प्राप्त केली. उमेदवारांचे पालक व कुटुंबीय यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय सेवेची नियुक्तीपत्रे प्राप्त केलेल्या उमेदवारांनी आनंद व समाधानाची भावना यावेळी व्यक्त केली. उमेदवारांचे मनोगत व्यक्त करणारी चित्रफित यावेळी सादर करण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान

राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मंत्री महोदयांच्या उपस्थितीत आज अनुकंपा तत्त्वावरील व सरळ सेवेद्वारे नियुक्त लिपिक-टंकलेखक अशा १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. नवीन भरती झालेल्या उमेदवारांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे ह्या कार्यक्रमाचे प्रसारण नागपूर येथे आयोजित या कार्यक्रमात करण्यात आले.

 

 प्रतिनिधिक स्वरूपात नियुक्ती आदेश वितरित करण्यात आलेले उमेदवार

     महसूल विभागात महसूल सहायक या पदावर माला शंकरराव पापळकर, अस्मिता रमेश गिरी, पवन रुपराव तागडे, सचिन प्रकाशराव खेडकर, ग्राम महसूल अधिकारी मधुकर देवराव गायकवाड, शिपाई पदावर यश दत्तकुमार कामडे, प्राची प्रभाकर लाखे, अयुब सुजेन पठाण यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

नागपूर महापालिकेत कनिष्ठ अभियंता या पदावर पार्थ अनिल दुपल्लीवार, प्रज्वल अनंत वैद्य, स्थापत्य अभियंत्रिकी सहायक म्हणून सुरभी शंकरराव रोडगे, परिचारीका पदावर सिमा निवृत्ती बडे, कनिष्ठ लिपीक या पदावर शुहेला कौसर जौ. सैयद आदिल तर सफाई कर्मचारी अविनाश अजय हारकर यांना नियुक्ती देण्यात आली.

 

जिल्हा परिषदेअंतर्गत अंगणवाडी परिवेक्षिका शुभांगी हरिहर समरीत, व विस्तार अधिकारी अक्षय किशोर वानखडे, नगरपालिका प्रशासन येथे फायरमॅन पदावर मोहम्मद अनस वल्द अल्ताफ हुसैन, सार्वजनिक बांधकाम विभागात लिपीक या पदावर रविंद्र गजानन ठाकरे, कविता रेशवंत हजारे यांना शिपाई, पोलिस विभागात लिपीक पदावर स्वाती रमेश गवळी व शिपाई या पदावर सुप्रिया शांतराम लोहे यांना उपस्थितांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. 

             

00000

 

 


Friday, 3 October 2025

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तकांच्या स्टॉलचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन

 


 

समता रॅली व नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटन 

       नागपूर, दि. 02 :  69 व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून दिक्षाभूमी नागपूर येथे येणाऱ्या सर्व भाविकांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती मिळावी म्हणून सर्व योजनांची माहिती असणारे विविध स्टॉल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परीसरात लावण्यात आले.  सदर स्टॉलचे उद्घाटन  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री  संजय शिरसाट व खासदार श्यामकुमार बर्वे यांचे हस्ते करण्यात आले. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी नागपूर यांचेद्ववारे आयोजित समता रॅली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे लावण्यात आलेल्या नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

            माहिती पुस्तके, बुकलेट, घडी पुस्तिका आदीद्वारे माहिती सर्वसामान्य जनतेला पोहोचविण्याचे काम या स्टॉलद्वारे करण्यात येत आहे. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक सुनिल वारे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार,  समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी,  चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. सिद्धार्थ गायकवाड, नागपूर  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. मंगेश वानखडे,  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी,  श्रीमती आशा कवाडे,  जिल्हा परीषदेचे  जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुखदेव कौरती आदी उपस्थित होते.

 

00000

 

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट

 

 

       नागपूर, दि. २: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीला अभिवादन केले. यावेळी त्यांनी आयोजित बुद्ध वंदनेत सहभाग घेतला.

        महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे,  जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी यावेळी उपस्थित होते. 

       सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत मुख्यमंत्री म्हणाले की, ड्रॅगन पॅलेस टेंपल आज आंतरराष्ट्रीय स्थळ झाले आहे. आता ड्रॅगन पॅलेसची जगभरात ओळख निर्माण होत आहे. परदेशातूनही अनेक नागरिक येथे येऊन बुद्धवंदनेत सहभागी होत असतात. नागपूरात आल्यावर प्रत्येकाची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट द्यायची इच्छा होत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  

                                                                 00000

 


केपीसीएल व अरविंदो कंपनीच्या प्रकल्पांद्वारे बाधीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी घेतली आढावा बैठक

 

 

नागपूर, दि. 01 : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्याच्या बराज मोकासा स्थित केपीसीएल कंपनीच्या कोळसा खाण आणि याच तालुक्यातील बेलोरासहीत अन्य 11 गावांच्या जमीनी अधिग्रहणाद्वारे बाधीत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय मागावर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली.

 

या बैठकीस वरोरा मतदार संघाचे आमदार करण देवतळे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्‍मी बिदरी, अपर आयुक्त पुनर्वसन प्रदीप कुलकर्णी, चंद्रपूरचे अपर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, खनिकर्म संचालक डॉ. जी. डी. कामडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अतुल जताळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे, बाधीत शेतकरी व केपीसीएल आणि अरविंदो कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

बराज मोकासा येथील कोळसा खनन प्रकल्प उभारतांना केपीसीएल कंपनीने केलेल्या कराराची अंमलबजावणीबाबत यावेळी सविस्तर माहिती घेण्यात आली. या करारानुसार प्रकल्पग्रस्तांना रोजगार, जमिनीचा मोबदला आदींबाबत यापूर्वीच्या बैठकांमध्ये देण्यात आलेल्या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. या करारानुसार कंपनीने आश्वासित कामे वेळेत पूर्ण करावी व ती पूर्ण न झाल्यास कंपनीवर नियमाप्रमाणे कारवाई करावी, असे आदेश श्री अहीर यांनी दिले.

 

बेलोरा व नजिकच्या 11 गावांच्या शेतकऱ्यांची जमीन भुसंपादन करतांना अरविंदो कंपनीने शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. या भुसंपादनास 11 गावांतील 6 ग्रामपंचायतींनी ग्रासभेत विरोध दर्शविल्याची बाबही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मांडली. यासंदर्भात दखल घेत श्री. अहीर यांनी भुसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार व्हावी व याआधी झालेली प्रक्रिया तपासण्यासाठी तातडीने जिल्हा प्रशासनाने बैठक घ्यावी, अशी सूचना केली.

0000


राज्यभर 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान "अभिजात मराठी भाषा सप्ताह" 6 ऑक्टोबरला नागपूरात "माझ्या मराठीचा टिळा" कार्यक्रम

 


नागपूर, दि. 01 : केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केल्याच्या औचित्याने मराठी भाषा विभागाच्या वतीने 3 ते 9 ऑक्टोंबर 2025 दरम्यान राज्यभर 'अभिजात मराठी भाषा सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत नागपूर येथील वनामती सभागृहात 6 ऑक्टोंबर रोजी ‘माझ्या मराठीचा टिळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 

केंद्र शासनाने 4 ऑक्टोबर 2024 च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने 14 ऑक्टोंबर 2024 रोजी शासन निर्णयाद्वारे 3 ऑक्टोबर हा "अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस" व 3 ते 9 ऑक्टोबर हा "अभिजात मराठी भाषा सप्ताह" म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. यानुसार मराठी भाषा विभागाच्या वतीने 3 ते 9 ऑक्टोंबर 2025 दरम्यान राज्यभर 'अभिजात मराठी भाषा सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले आहे.  

यादरम्यान मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर येथील वनामती सभागृहात 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 ते 8 वाजेदरम्यान ‘माझ्या मराठीचा टिळा हा निवडक कवितांच्या गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जास्तीत -जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन, मराठी भाषा विभागाच्या अवर सचिव शिल्पा देशमुख यांनी केले आहे. 

00000