Ø
6 नोव्हेंबरपर्यंत दावे स्वीकारण्यात
येणार
Ø
30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
होणार
नागपूर, दि. 29 : विभागातील पदवीधर मतदार
संघासाठी 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरिता
कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर
2025 रोजी मतदार नोंदणीची जाहीर सूचना प्रसिद्ध होणार असून 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत
याबाबत दावे स्वीकारण्यात येणार आहे तर अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध
करण्यात येणार आहे. या विशेष मतदार नोंदणी मोहिमेत नागपूर विभागातील सर्व पदवीधरांनी
सहभाग घेवून नोंदणी करावी, असे आवाहन नागपूर विभागाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय
आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे.
निवडणूक नोंदणी
कार्यक्रमानुसार वर्तमानपत्राद्वारे 15 ऑक्टोंबर रोजी जाहीर सूचनेतील प्रथम पुर्नप्रसिद्धी
तर 25 ऑक्टोंबर ला द्वितीय पुर्नप्रसिद्धी करण्यात येणार आहे. 6 नोव्हेंबर ही नमुना
18 द्वारे अर्जदारांचे दावे स्वीकारण्याची अंतिम मुदत राहील. 25 नोव्हेंबर रोजी प्रारूप
मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहे तर 10 डिसेंबर पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार
आहे. 25 डिसेंबर रोजी दावे व हरकती निकालात काढून पुरवणी यादी तयार करण्यात येईल आणि
30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार मोहिमेनंतरही
ज्यांची नोंदणी शिल्लक आहे, अशा पदवीधरांना उमेदवारांच्या अंतिम नामनिर्देशनच्या
10 दिवस आधीपर्यंत नोंदणी करता येणार असून त्याची स्वतंत्र पुरवणी यादी प्रसिद्ध करण्यात
येणार असल्याचे, श्रीमती बिदरी यांनी स्पष्ट केले.
पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत एकत्रित स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यासाठी पदवीधरांना पदनिर्देशीत अधिकाऱ्यांकडे स्वत: नोंदणी करणे आवश्यक आहे. स्वत: अर्ज दाखल करण्यास असमर्थ असणाऱ्या व्यक्तीला पोस्टाद्वारे अर्ज करता येणार आहे मात्र पोस्टाद्वारे पाठविण्यात आलेले एकत्रित अर्ज स्वीकारले जाणार नाही. तसेच राजकीय पक्ष त्यांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी किंवा रहीवास कल्याण संघटनांकडून एकत्रित स्वरूपात प्राप्त अर्ज स्वीकाराले जाणार नाही मात्र, एकाच घराचा पत्ता असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना एकत्रित अर्ज देता येणार असल्याचे श्रीमती बिदरी यांनी सांगितले. येथे मिळणार अर्ज
पदवीधर मतदार नोंदणीसाठी विहित नमुना 18 चा अद्ययावत अर्ज भरणे गरजेचे असून अर्ज मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Graduates-and-Teachers-Constituencies-२०२५.aspx या संकेतस्थळावर तसेच पदनिर्देशीत अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध होणार आहे.
अर्ज नोंदणीसाठी अर्हता
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील सर्व साधारण रहीवासी असलेली व 1 नोव्हेंबर 2025 पूर्वी किमान तीन वर्ष भारतातील विद्यापीठाची पदवीधर किंवा त्याच्याशी समतुल्य अर्हता धारण करीत असलेली प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे. तीन वर्षाचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता पदवी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे अशा विद्यापीठ किंवा अन्य संबंधित प्राधिकरणाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात येणार आहे. पदवी अर्हतेसंबंधतील सविस्तर माहिती आयोगाच्या परिशिष्ट 25 मध्ये नमुद आहे.
नागपूर पदवीधर मतदार संघाविषयी
नागपूर पदवीधर मतदार संघात यापूर्वी 2020 मध्ये झालेल्या निवडणूकीत 256 मूळ मतदान केंद्र आणि 66 सहायकारी केंद्र असे एकूण 322 मतदान केंद्र होते. तर विभागात एकूण 1 लाख 25 हजार 439 पुरूष आणि 80 हजार 976 महिला तर 39 इतर असे एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदार संख्या होती.
नागपूर पदवीधर
मतदार संघात नागपूर,वर्धा,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश
होतो. मतदार नोंदणीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी या मतदार नोंदणी अधिकारी
असतील तर सहाही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी हे सहायक मतदार नोंदणी
अधिकारी असतील.विभागात एकूण 43 सहायक मतदार नोंदणी अधिकारी असून नागपूरमध्ये 13, वर्धा
5, भंडारा 4, गोंदिया 5, चंद्रपूर 9 आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 7 सहायक मतदार नोंदणी
अधिकारी असणार आहेत. तसेच विभागात एकूण 256 पदनिर्देशीत अधिकारी असणार आहेत. यात नागपूरमध्ये 139, वर्धा 29, भंडारा 18, गोंदिया
17, चंद्रपूर 36 आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 17 पदनिर्देशीत अधिकारी असल्याचे श्रीमती
बिदरी यांनी सांगितले.
0000